पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे ठकूबाई परशुराम खारपाटील मराठी माध्यम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, चिरनेर, उरण, जि. रायगड येथे महाराष्ट्र शासन वनविभाग, अलिबाग वनविभाग, उरण वनपरिक्षेत्र आणि फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना वनविभाग तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो, वन्यजीव-मानव संघर्ष, वैश्विक तापमानवाढ, प्रदूषण, भविष्यात निर्माण होणाऱ्या मानवनिर्मित समस्या, परिसंस्थेचे महत्त्व, अन्नसाखळी, तसेच मानवी जीवनातील वन्यजीवांचे स्थान आणि वन्यजीवांपासून मानवाला मिळणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वन्यजीव संरक्षण व संवर्धन, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, पाणी संवर्धन तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत रामदास ठाकूर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष वन्यजीव, निसर्ग आणि परिसंस्थेच्या संरक्षण-संवर्धनाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने शासनस्तरावर तसेच विविध निसर्गसंवर्धन संस्थांच्या माध्यमातून अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या मनात लहान वयातच वन्यजीव संरक्षण, निसर्गसंवर्धन आणि पर्यावरणीय जबाबदारीची मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या कार्यक्रमासाठी पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे ठकूबाई परशुराम खारपाटील मराठी माध्यम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, चिरनेर येथील प्राचार्य मिलिंद पट्टेबहाद्दूर ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास उरण वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी श्री. खाडे, नियतक्षेत्र अधिकारी भूषण साळुंखे व अनिकेत झेंडे तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे सदस्य हिम्मत केणी, राकेश शिंदे, निकेतन रमेश ठाकूर व प्रथमेश मोकल यांची उपस्थिती लाभली.