37 वर्षाची अखंडित परंपरा जपत अंबड येथील नवरत्न गणेश मंडळाच्या वतीने गणरायांची भक्तिभावाने स्थापना!
सामाजिक, धार्मिक, मनोरांजनात्मक उपक्रमाचे गणेश उत्सवात भरीव योगदान

अनिल भालेकर/अंबड,दि.15
सर्वांना वेध असणाऱ्या गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. अंबड शहरात देखील मोठ्या भक्तीभावाने विविध गणेश मंडळाच्या माध्यमातून श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील चांगले नगर मधील गेल्या 37 वर्षाची अखंडित परंपरा जपणारे मानाचे गणेश मंडळ म्हणून नावलौकिक प्राप्त असणारे नवरत्न गणेश मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात, वाजत गाजत, भक्ती भावाने श्री गणरायांची स्थापना करण्यात आली.
मुरलीमनोहर सोबत राधिकाच्या रूपातील अत्यंत सुरेख मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. नवरत्न गणेश मंडळाचे वतीने संपूर्ण गणेश उत्सवाच्या काळात स्वच्छता अभियान, भव्य नृत्य कला स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे नियोजनबद्ध,यशस्वी आयोजन करत सामाजिक व एकतेचा संदेश दिला जातो. या संपूर्ण काळात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते.
नवरत्न गणेश मंडळ आयोजित भव्य नृत्य कलाविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी सहभागी होतात एक प्रकारे शहरातील व पंचक्रोशीतील कलाकारांना मोठे व्यासपीठ यामुळे उपलब्ध होते तर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धेमधून महिलांना काही काळ आपल्या व्यस्त कामकाजातून विरंगळा मिळतो.
सर्वांचे आवडीचे मंडळ म्हणून नवरत्न गणेश मंडळ ओळखले जाते व त्यामुळे संपूर्ण गणेश उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी या मंडळात दिसून येते. शिस्तबद्ध व नियोजनबद्ध गणेश उत्सव संपन्न होण्यासाठी नवरत्न गणेश मंडळाचे सर्व स्वयंसेवक संपूर्ण कालावधीमध्ये अत्यंत जबाबदारी पूर्वक व निष्ठेने कार्यरत असतात.




