पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला; जाफ्राबादमध्ये पत्रकारांचा एल्गार जाफ्राबाद पोलीस स्टेशनला निवेदन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5
दैनिक जगाचा जगमित्र चे संपादक संतोष भुतेकर यांच्यावर जालना येथे दि. २ जून २०२६ रोजी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जाफ्राबाद मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जाफ्राबाद पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकारांनी पत्रकारांवर वाढत चाललेले हल्ले ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केले जात असल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे त्यांनी नमूद केले. संतोष भुतेकर यांनी अवैध गुटखा व्यवसायाविरोधात सातत्याने वृत्तांकन केल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत असून, ही घटना पत्रकारितेचे स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न असल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार समाजहितासाठी कार्य करत असतात. सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांवर गुन्हेगारांकडून हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी एकमुखाने सांगितले की, पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने अधिक प्रभावी भूमिका घ्यावी. या घटनेमुळे पत्रकारिताविश्वात संतापाची लाट पसरली असून दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुकेश भरद्वाज, ज्येष्ठ पत्रकार मोहनराव मुळे, चेतन बयास, शेख कदीर, विशाल वाकडे, भरत लहाने, सचिन चुगडा, प्रल्हाद लोणकर, सलमान पठाण, हरी भालके, ज्ञानेश्वर पाबळे, गोपाल बरहाटे, शिरीष खंडेलवाल, झहीर यार खान, शेख अजीम यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
