ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा ठसा अभिमानास्पद : सुनील बनकर, भारत टॅलेंट सर्च परीक्षेत कल्पना बनकर ची सरशी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.20
भारत टॅलेंट सर्च (BTS)–2026 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत देळेगव्हाण येथील कु. कल्पना निवृत्ती बनकर हिने उल्लेखनीय यश संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने विद्यार्थिनी व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण गावातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. सत्कार समारंभास सुनील बनकर, परमेश्वर बनकर, संतोष हिवाळे, भगवानराव बनकर, विलासराव पंडित, दगडुबा बनकर, शिवाजी कापसे, नितीन बनकर, पांडव सर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनीचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सुनील बनकर म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळाल्यास ते कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवू शकतात. आज ग्रामीण विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा ठसा राज्य व देशपातळीवर उमटत आहे. कु. कल्पना बनकर हिने मिळविलेले यश हे संपूर्ण देळेगव्हाण गावासाठी अभिमानाची बाब असून तिचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा.” यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनीच्या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पालक आणि समाजाची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कु. कल्पना बनकर हिच्या या यशामुळे देळेगव्हाण गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




