तीनशे एक विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अंबड/अनिल भालेकर,दि.12
पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तिरुपती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, जामखेड येथे शाडूमातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेत तब्बल ३०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वतःच्या हातांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांना शाडूमाती उपलब्ध करून देत मूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आली. शाडूमातीची योग्य हाताळणी, मूर्तीचा आकार व प्रमाण, विविध कलाकुसर तसेच गणेशमूर्तीला सुबक आणि आकर्षक स्वरूप देण्याच्या तंत्राबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी साकारलेल्या गणेशमूर्तींचे परीक्षणही करण्यात आले. या स्पर्धेत भक्ती मोंढे हिने प्रथम क्रमांक, मनस्विनी भोजने हिने द्वितीय क्रमांक, तर अभिमन्यू जाधव याने तृतीय क्रमांक पटकावला. श्रेयस भिसे याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यशाळेस कला शिक्षक रामेश्वर काळे सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत मूर्ती घडविण्याच्या विविध बारकाव्यांची माहिती करून दिली. विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीबाबत मार्गदर्शन करत त्यांनी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या कलेचे प्रशिक्षण दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळालेच, शिवाय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला. ‘मातीचा गणपती, पर्यावरणाची हमी’ हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून प्रत्यक्षात साकारला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गंगाधरजी पांढरे यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.संस्थेच्या संचालिका आशाताई पांढरे म्हणाल्या, “गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाचा सण आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे.”
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि कलाकौशल्याने साकारलेल्या गणेशमूर्तींमधून ‘कला जपूया, पर्यावरण वाचवूया’ हा प्रेरणादायी संदेश दिला. त्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ करणारी उपक्रमशील पाऊल ठरली.




