टेंभुर्णी येथे सेवानिवृत्त बोरकर सर यांचा महात्मा फुले वाचनालयात मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
टेंभुर्णी येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘जे बी के महाविद्यालय’, टेंभुर्णी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. बोरकर सर यांचा महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक वाचनालय व मराठी पत्रकार संघ, टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने भावूक वातावरणात व उत्साहात नागरी सत्कार करण्यात आला.
स्थानिक महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक पी. जी. तांबेकर हे होते. शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त झालेले श्री. बोरकर सर यांनी आपल्या अध्यापन काळात शेकडो विद्यार्थ्यांना घडवले. त्यांच्या या अखंड ज्ञानदानाच्या कार्याचा आणि निष्ठावंत सेवेचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. बोरकर सर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बोरकर सर भावूक झाले होते. त्यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत, “विद्यार्थ्यांचे यश आणि समाजाचे प्रेम हीच माझ्या आयुष्यातील खरी पुंजी आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात पी. जी. तांबेकर यांनी बोरकर सरांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास परिसरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विष्णू सांगुळे, मधुकर गोफणे, सरपंच शेख साबेर, शिवाजी खाडेभराड, बालाजी शेवाळे, अशोक पाबळे, दिनकर ससाणे, पवन झोरे, रामेश्वर खाडेभराड, शैलीप्रकाश वाघमारे, साई बोर्डे, राजेश शेवाळे, भास्कर गोफणे, भागाजी वाघमारे, सुनिल भाले, नसीम शेख, कार्तिक डोमाळे, यश पैठणे आणि गजानन देठे या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनीही बोरकर सरांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नेटके आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन रावसाहेब अंभोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास टेंभुर्णी परिसरातील नागरिक, पत्रकार आणि वाचनालयाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



