जालना जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य जनजागृतीला वेग
जालना/प्रतिनिधी,दि.1
राज्य शासनाच्या निर्णयानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जालना जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमांमधून महिला व मुलींचे आरोग्य, HPV लसीकरण तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्यात आली.
तीर्थपुरी येथील मराठवाडा विद्यालयात HPV लसीकरणाबाबत माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींना HPV विषाणूमुळे होणारे आजार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय आणि HPV लसीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून ‘प्रतिबंध हाच उपचाराचा उत्तम मार्ग’ हा संदेश देण्यात आला. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक प्रमुख आजार असल्याने HPV लसीकरणाबाबत जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे किशोरवयीन मुली तसेच महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
तसेच ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत श्री गणेश आयुर्वेद शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रक्तातील साखर तपासणी करून आवश्यकतेनुसार नागरिकांना औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यविषयक तक्रारींबाबतही नागरिकांना आवश्यक सल्ला देण्यात आला. या शिबिरात एकूण ३६८६ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढली आहे.



