दूषित पाण्यामुळे रोगराईचा वाढतोच प्रकोप,ग्रामसेवक मात्र परजिल्ह्यात राहून काढतात झोप !
उन्हाळ्यात पाणीटंचाईवर बोंब ठोकणारे ग्रामसेवक आता पाणी फिल्टर व कॉईन बॉक्स बंद असल्याचे आणत आहेत सोंग!

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.20
जाफ्राबाद तालुक्यातील खापरखेडा गावात सध्या नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प व कॉईन बॉक्स अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र याकडे संबंधित ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,उन्हाळ्याच्या काळात पाणी टंचाईबाबत वारंवार वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे ग्रामसेवक आता “लाईट नाही”, “पाणी फिल्टर बंद आहे”, “कॉईन बॉक्स खराब आहे” अशी कारणे पुढे करून जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्रामसेवक मुख्यालयी न राहता परजिल्ह्यातूनच कारभार पाहत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर आहेत, तरीही नागरिकांना वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. ग्रामस्थांनी सांगितले की,कॉईन बॉक्स दुरुस्त करण्याबाबत विचारणा केली असता, “आता सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. त्यानंतर कार्यालयीन वेळेत पाहू,” असे बेजबाबदार उत्तर संबंधित कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नावर अशी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून अतिसार,पोटदुखी,उलट्या,ताप यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने पाणी शुद्धीकरण यंत्रणा व कॉईन बॉक्स सुरू करून सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी असा सवाल उपस्थित केला आहे की,”दूषित पाण्यामुळे गावात रोगराई पसरल्यास त्याला जबाबदार कोण? मुख्यालयी अनुपस्थित राहून कारभार करणाऱ्या ग्रामसेवकांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” ग्रामस्थांनी जिल्हा परिषद,गटविकास अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हा असा प्रकार जाफ्राबाद तालुक्यातील सर्वच गावांमध्ये असून कधी गटविकास अधिकारी नसणे, कधी प्रभारी गटविकास अधिकारी असणे, आणि आहे ते गटविकास अधिकारी कामाचा व्याप जास्त असल्याचे कारण सांगून ग्रामसेवक लोकांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार या निमित्ताने समोर येतोय..




