“स्कूल ठीक करो अभियान – आता जन आंदोलनाची वेळ” — बोरशे गुरुजी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
शिक्षणाशिवाय राष्ट्र घडत नाही. शिक्षणाशिवाय समाज प्रगत होत नाही. शिक्षणाशिवाय तरुणांचं भविष्य घडत नाही.
हे सत्य आता कोणालाही नाकारता येणार नाही. प्रश्न पडतो – मग आपल्या देशातील, राज्यातील, गावातील सरकारी शाळा आणि जिल्हा परिषद शाळांची ही अवस्था का?
याच उत्तरासाठी देशभरात सुरू झाले आहे “स्कूल ठीक करो अभियान”. हे फक्त अभियान नाही, ही काळाची गरज आहे. ही एक चळवळ आहे. हे आता जन आंदोलन बनलेच पाहिजे.सर्व स्तरातील नागरिकांनी,मिडीयाच्या लोकांनी,शासन व प्रशासनातील लोकांनी या अभियानात सहभागी होणे काळाची गरज आहे.
1. का जन आंदोलन? कारण पर्याय नाही
आज नर्सरीच्या मुलासाठी वर्षाला लाख रुपये फी. LKG पासूनच पालकांचे कर्ज. शिक्षणाचा धंदा करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि शिक्षणाची गुणवत्ता घसरली.
परिणाम काय? सर्वसामान्य, शेतकरी, गरीब व मजूर वर्गाच्या मुलांना चांगले शिक्षण परवडेनासे झाले आहे.अनेक मुलमुली शिक्षणापासुन वंचीत राहण्याची भीती निर्माण झाली आहे.दुर्दैवाने शासनकर्ते हेतुपुरस्पर शाळाबंद करण्याच्या मनस्थितीचे आहेत.
यावर एकमेव उपाय – आपल्या दारातील सरकारी शाळा आणि ZP शाळा नंबर 1 करणे.
शाळा चांगली झाली की मुलगा आई-वडिलांच्या नजरेखाली राहील. लाखो रुपयांचा खर्च वाचेल. आणि देशाला घडवणारी पिढी तयार होईल. यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
2. पुरावा जमिनीवर आहे – आम्ही पाहणी केली आहे
बोलणं सोपं आहे, काम करणं कठीण. आम्ही ते केलं आहे.
मागील वर्षी आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही राज्यव्यापी शाळा पाहणी दौरा केला.
मी आणि माझी भोकरदन टीम यांनी भोकरदन तालुक्यातील 76 शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.
काय दिसले?
पडलेल्या खोल्या, पिण्याच्या पाण्याची वानवा, घाणेरडे टॉयलेट, खेळाचे मैदान नाही, शैक्षणिक गुणवत्ता खालावली, शिक्षकांवर बिगर-शैक्षणिक कामाचा बोजा.
या सर्व समस्या एकत्र करून आम्ही गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर “झोपा काढो आंदोलन” केले. प्रशासनाला झोप आली आहे का हे दाखवून दिले. त्याचा परिणाम झाला. काही शाळांना निधी मिळाला, काही दुरुस्ती झाल्या. म्हणजे आंदोलनातूनच बदल होतो.
3. आता वेळ आहे – सर्वांनी सहभागी होण्याची
आज “स्कूल ठीक करो अभियान” देशव्यापी होत आहे. ही सुवर्णसंधी आहे.
माझे 3 आवाहन:
1. प्रत्येक गावातील सुज्ञ नागरिकांना : आपल्या मोहल्यातील, आपल्या गावातील शाळा आपणच सुधारू. ग्रामसभेत ठराव पास करा. शाळा दत्तक घ्या. CJP ही एक चळवळ आहे. या चळवळीचे देशव्यापी आंदोलन होण्यासाठी सर्व पालकांनी सहभागी व्हावे.
2. शिक्षकांना : गुरुजींनो, तुम्ही या अभियानाकडे सकारात्मकतेने पहा. तुम्हाला फक्त शिकवू द्या अशी मागणी आपण एकत्र करू. तुम्ही या आंदोलनाचे नेतृत्व करा.
3. सरकारला, मंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना : ही राजकीय संधी नाही, ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. प्रत्येक ZP शाळेला थेट निधी द्या. इमारत, स्मार्ट क्लास, लॅब, खेळाचे मैदान, निवासी सुविधा द्या. या जन आंदोलनात आपण पुढाकार घ्या.
4. परिणाम काय होईल?
जर देशातील सर्व सरकारी शाळा “सर्व सोयींनी युक्त” झाल्या तर…
गोरगरीबाचे लेकरू शिकेल. पालकांचा लाखो रुपयांचा भार कमी होईल.f मुलं सुरक्षित राहतील. आणि सर्वात महत्वाचे – देश नंबर 1 बनेल.
शेवटचा शब्द
शिक्षणाने कुटुंब प्रगत होते. शिक्षणाने समाज प्रगत होतो. शिक्षणाने देश प्रगत होतो.
म्हणून घाई न करता, शांततेत पण ठामपणे आपण सर्वांनी या “स्कूल ठीक करो” जन आंदोलनात सहभागी होऊया.
कारण शाळा सुधारली की पिढी सुधारेल. आणि पिढी सुधारली की राष्ट्र घडेल.
“आगे बढो अभिजीत दीपके, हम तुम्हारे साथ है”
जयहिंद! जय भारत!
