“विकासाच्या नावाखाली गावपण हरवू देऊ नका” – सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांचे आवाहन घरोघरी जाऊन तसेच सोशल मीडियाद्वारे विलास गावंड करीत आहेत जनजागृती.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11
ग्रामीण भागातील शेतजमिनी, पर्यावरण आणि सामाजिक जीवनावर वाढत्या नागरीकरणाचा होणारा परिणाम लक्षात घेता, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी ग्रामस्थांना जागृत राहण्याचे आणि आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित होण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांशी संवाद साधताना विलास गांवड म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या सुपीक शेतजमिनी, आज विकासाच्या नावाखाली हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या जमिनी केवळ मालमत्ता नसून त्या आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि उपजीविकेचा आधार आहेत. त्यामुळे कोणताही विकास आराखडा राबविताना स्थानिकांच्या हिताचा आणि पर्यावरणाचा विचार होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, मोठे महामार्ग, उंच इमारती आणि नागरी सुविधा यांनाच विकासाचे मोजमाप मानणे योग्य नाही. खरा विकास तोच, जो माणसाला आनंद, सुरक्षितता आणि स्वावलंबन देतो. आज शहरांमध्ये राहणारे अनेक लोक शांतता, स्वच्छ हवा आणि निसर्गाच्या शोधात ग्रामीण भागाकडे येत आहेत. अशा वेळी गावातील नैसर्गिक संपत्ती आणि जीवनमूल्ये जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. विलास गांवड यांनी गावांच्या सामाजिक रचनेकडेही लक्ष वेधले. “गाव म्हणजे केवळ घरांची वस्ती नसते. तेथे नातेसंबंध, जिव्हाळा, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी असते. संकटाच्या काळात शेजारी धावून येतो, सुख-दुःखात संपूर्ण गाव सहभागी होते. हीच ग्रामीण संस्कृतीची खरी ताकद आहे. नागरीकरणाच्या वेगात ही मूल्ये हरवू नयेत,” असे त्यांनी सांगितले. शेती, मच्छीमारी, भाजीपाला आणि फळबागा या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांनी पुढील पिढ्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. “आज आपण ज्या जमिनीवर उभे आहोत, तीच उद्याच्या पिढ्यांची उपजीविका आहे. जमीन गेली तर केवळ मालमत्ता नाही, तर स्वावलंबनाची संधीही नष्ट होईल,” असे ते म्हणाले. विकासाला विरोध नसून तो पर्यावरणपूरक, लोकाभिमुख आणि शाश्वत असावा, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ग्रामस्थांनी जागरूक राहून विकास योजनांची माहिती घ्यावी, पर्यावरणीय परिणाम समजून घ्यावेत आणि आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. “आपले घर, गाव, शेती आणि पर्यावरण यांचे रक्षण करणे ही केवळ आजची नव्हे तर भावी पिढ्यांप्रती असलेली जबाबदारी आहे. विकास हवा, पण तो आपल्या अस्तित्वाच्या किंमतीवर नको,” असा संदेश सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी दिला आहे. याबाबत ते घरोघरी जाऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती करीत आहेत.



