विद्यार्थ्यांना चिखलवाट तुडवत शाळेचा रस्ता पार करावा लागतो गणेशपूर ते टेंभुर्णी या दोन किलोमीटर रस्त्याची झाली दुरवस्था

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
टेंभुर्णी, जाफराबाद तालुक्यातील गट ग्रामपंचायतमधील गणेशपूर ते मुख्य फाट्यापर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरचा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांना दररोज चिखलवाट तुडवत शाळेचा रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावातील गणेशपूर येथे अनेक कुटुंबे वास्तव्यास असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जावे लागते. हा रस्ता दयनीय स्थितीत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, साचलेले पाणी यामुळे वाहने घसरून अपघातांची शक्यता वाढली आहे. काही वेळा एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला दवाखान्यात नेणेही कठीण होते. गणेशपूरमध्ये पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दररोज टेंभुर्णी येथे जावे लागते. मात्र, गणेशपूरकडे जाणारा दोन किलोमीटरचा मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने गावात कोणतीही सार्वजनिक बस किंवा खासगी वाहने येण्यास तयार नाहीत. रस्ता खराब असल्याने शाळा भरण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना रस्त्यावरील चिखलातून आणि गटारातून वाट काढत टेंभुर्णी गाठावी लागते. या बिकट परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाचा धोका निर्माण झाला असून, त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन बराच कालावधी उलटला आहे. टेंभुर्णी : गणेशपूर ते टेंभुर्णी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. मात्र, प्रत्यक्षात रस्ता तयार करण्याऐवजी गावात फक्त उद्घाटनाच्या पाट्या लावून प्रशासनाने बोळवण केली आहे. प्रत्यक्ष रस्ता मात्र जैसे थे असून, पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचे साम्राज्य बनला आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे गणेशपूरच्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी आणि जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी तत्काळ दखल घेऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. ___________________ ______________________
गणेशपूर फाटा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत जावे लागते, या रस्त्यांच्या उद्घाटनच्या पाट्या लागल्या परंतु प्रत्यक्षात काम काही झाले नाही. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने रस्त्यांचे काम करावे. – गजानन अंधारे, ग्रामस्थ गावात फक्त पाचवीपर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी टेंभुर्णी, देऊळगाव राजा या ठिकाणी जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढूत शाळेत जावे लागते. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी लक्ष घालून रस्त्यांची दुरुस्ती करावी. माधवराव अंधारे, माजी उपसरपंच




