नवउद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 9
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राज्यभरात सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी कार्यशाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शनासह विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार, दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी वित्तीय सहाय्य आणि मार्जिन मनी योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जाईल. असेही कळविले आहे.




