उन्हाची दाहकता पाहता शाळा सकाळ सत्रात घ्या : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
यावर्षी पावसाळा लांबल्याने उन्हाची दाहकता व तीव्रता कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात 15 जून पासून सुरू होणाऱ्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या लेखी निवेदनात संघटनेने म्हटले आहे की सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असून तापमानात लक्षनीय वाढ झालेली आहे. तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई चा प्रश्न देखील आहे. अशावेळी विध्यार्थ्यांना उष्माघात,निर्जलिकरण तसेच आरोग्या च्या समस्या उद्भवू शकतात.यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 15 जून ते 30 जून पर्यंत शाळेचे वेळापत्रक सकाळ सत्रात ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ.रविंद्र काकडे, जिल्हा युवा नेता जितेंद्र कांबळे, जालना तालुकाध्यक्ष गौतम गवई, जिल्हा उपाध्यक्ष विजय सदावर्ते, युवराज पढिभार,संदीप गवई,सतिश बोर्डे,किरण साळवे,सुनील भालतिलक,भानुदास लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत. चौकट – उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा २२ जून रोजी उघडत आहे. याशिवाय २२ जून ते ३० जून पर्यंत त्या शाळा सकाळ सत्रात घेण्याचे सुचविले आहे. जालना जिल्हा हा विदर्भाला लागूनच असल्याने इकडेही उन्हाची दाहकता तीव्र आहे. शिवाय अद्याप पाऊसही पडलेला नाही. त्यामुळे पत्राच्या खोल्यात बसणे विद्यार्थी व शिक्षकांना असाहाय्य होणार आहे. यामुळे विदर्भाप्रमाणे जिल्ह्यातील शाळा ही एकतर उशिरा सुरू कराव्यात किंवा सकाळ सत्रात तरी भरवाव्यात. डॉ.. रवींद्र काकडे, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जालना फोटो – प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना निवेदन देताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी.



