श्रीक्षेत्र पुष्कराणी परिसरात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क सुरक्षा उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
जालना/प्रतिनिधी,दि.11
श्रीक्षेत्र पुष्कराणी, ता. माजलगाव, जि. बीड येथे काल (दि.10) घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत तसेच नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व संबंधित विभागांना तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार महसूल, पोलीस, नगर परिषद आणि इतर संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून नदी, तलाव, घाट परिसर आणि जलवाहतुकीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास सांगितले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन गोळेगाव, सावंगी गंगाकिनारा आणि पुष्कराणी परिसरातील नौकाविहार, घाट परिसर, बोट वाहतूक व भाविकांच्या हालचालींसाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (SOP) तयार करून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तहसीलदारांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करावे व तयार करण्यात आलेल्या एसओपीचे पालन होत असल्याची खात्री करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने विशेषतः नदीपात्रातील जलवाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून गोळेगाव, सावंगी गंगाकिनारा आदी ठिकाणी भाविकांची वाहतूक शक्यतो रस्तेमार्गाने (बाय रोड) वळविण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भाविक अथवा नागरिकांनी नदीपात्रातून किंवा बोटीच्या माध्यमातून प्रवास करू नये यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय नदीपात्रातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या विनापरवाना, अवैध अथवा असुरक्षित बोटींचे संचालन पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा बोटी आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. घाट परिसरात गर्दी नियंत्रण, प्रवेश व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमांचे पालन यासाठी आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी गोळेगाव व सावंगी गंगाकिनारा परिसरात आवश्यकतेनुसार स्वयंसेवकांची नियुक्ती करून नागरिकांना मार्गदर्शन, गर्दी व्यवस्थापन, सूचना प्रसारित करणे आणि सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीस मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नदीपात्राकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर, घाट परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी धोक्याबाबतचे सूचना फलक, दिशादर्शक फलक व प्रतिबंधात्मक सूचना लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल, पोलीस, नगर परिषद आणि इतर विभागांनी संयुक्त गस्त घालून नियमित पाहणी करण्यासही सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना, आपत्कालीन परिस्थिती किंवा नियमभंगाची घटना निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद देऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाय सुचवावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांच्याकडे सादर करावा, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. वरील सूचनांचे सर्व विभागांनी कठोर अंमलबजावणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



