उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला दुर्लक्षित; शेवटची घटका मोजतोय!

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
‘तिसरी मुंबई’ साकारत असलेल्या उरण तालुक्यात ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्याची मात्र दुरवस्था झाली आहे. रामायणकालीन संदर्भ असलेला, शिलाहार काळात बांधलेला हा किल्ला पोर्तुगीज, मराठे व ब्रिटिशांच्या सत्तेचा साक्षीदार आहे. शिवछत्रपतींच्या आरमारी मोहिमांमध्ये किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व होते. आज अभेद्य तटबंदी ढासळली असून बुरुजांना भेगा पडल्या आहेत. अनधिकृत बांधकामे ऐतिहासिक अवशेष गिळंकृत करत आहेत. पर्यटकांसाठी सोयीसुविधा नाहीत. मद्यपींच्या वावरामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. गडावरील द्रोणागिरी देवीच्या मंदिरामुळे धार्मिक महत्त्व टिकून आहे. वार्षिक जत्रेला हजारो भाविक येतात, पण ते मंदिरापर्यंतच मर्यादित राहतात. मुख्य ऐतिहासिक अवशेष नजरेआड जात आहेत. “संवर्धनाचे काम संथ गतीने सुरू आहे. वेळीच लक्ष न दिल्यास उरणच्या इतिहासाचा अध्याय कायमचा संपेल,” अशी खंत दुर्गप्रेमींनी व्यक्त केली. अटल सेतू व नवी मुंबई विमानतळामुळे उरणचे नाव जागतिक नकाशावर येत असताना ऐतिहासिक ठेवा जपण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उरणकर विचारत आहेत.




