आदर्श शिक्षक पुरस्काराने अनिल भालेकर सन्मानित
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव

अंबड/प्रतिनिधी,दि.3
अंबड येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव सोहळ्या निमित्त सावित्री ज्योती समाजभूषण पुरस्कार सोहळ्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत अनिल भालेकर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल “आदर्श शिक्षक सावित्री ज्योती समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विधी साहित्य कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून अनिल भालेकर यांना ओळखले जाते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिणामकारक विविध उपक्रम आयोजित करण्याबरोबरच,हसत खेळत आनंदाने बागडत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात त्यांचा हातखंड आहे. विद्यार्थ्यांशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करून त्यांच्यातील कलागुणांना योग्य व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. यापूर्वीही सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
आपल्या परंपरा चालीरीती व संस्कृती आधुनिक युगात अभिमानाने दर्शवण्याच्या हेतूने पारंपरिक धनगर समाज वेशभूषा अत्यंत लक्षवेधी ठरली. पारंपरिक धनगर समाज वेशभूषेत आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारल्याबद्दल अनिल भालेकर यांचे सर्वत्र अभिनंदन व विशेष कौतुक केले जात आहे.




