उरण मधील चाणजे परिसरात पाणीटंचाई
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा कोंढरीमध्ये यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेतून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आणखी किती वर्षे पाणीटंचाई सहन करायची असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. करंजा कोंढरी आणि परिसर हा तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीचा भाग आहे. जवळपास ५० हजार लोकवस्ती आहे. या विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींच्या योजना राबविल्या आहेत. मात्र तरीही येथील पाण्याचा प्रश्न न सुटल्याने करंजा येथील ग्रामस्थांनी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर काही महिन्यांनी आठ दिवसांनी पाणी मिळत होते. मात्र काही दिवसांपासून पाण्याची वाट पाहात असल्याची माहिती कोंढरी येथील विनायक पाटील यांनी दिली. कोट (चौकट ):- चाणजे ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. करंजापर्यंत पाणी नेण्यासाठी अनेकदा पम्पिंग करावे लागते. उपाययोजना केल्या जात असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. – सुधीर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, चाणजे ग्रामपंचायत



