महाराष्ट्र

महाराजा यशवंतराव होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !प्रा.एल.डी. सरोदे

जालना/प्रतिनिधी:दि.3

महाराष्ट्रीय जनांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मल्हारराव होळकर या मराठेशाहीच्या पूर्वार्धातील दिग्गजांचा प्रचंड अभिमान! याच कालखंडातील बहुधा अखेरचे धडाडीचे आणि धडपडीचे नाव म्हणजे यशवंतराव होळकर!निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी ‘आपला इतिहास’ या अत्यंत प्रसिद्ध अशा निबंधात भारतातल्या सर्वात पराक्रमी, शूरवीर, नामवंत योद्ध्यांच्या नामावलीत पोरस, शिवराय, विक्रमादित्य, बाजीराव, रणजितसिंग यांच्याबरोबरीने घेतलेले नाव म्हणजे यशवंतराव होळकर! थोर इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांना तर यशवंतरावांवर महाकाव्य लिहावेसे वाटले. कारण, हिंदूंनी तसेच सर्वच एतद्देशीयांनी एक होऊन ब्रिटिशांना समुद्रापल्याड पिटाळून लावावे, हा यशवंतरावांचा असलेला आग्रह! भारतीय इतिहासाच्या उत्तरार्धात देशातील एक राज्यकर्ता, संस्थानिक ब्रिटिशांपुढे माना तुकवत असताना त्याला विरोध करणारे यशवंतरावच होते.मराठेशाहीच्या अस्तकाळात यशवंतरावांनी स्वातंत्र्ययुद्धाला नवसंजीवनी दिली. तत्पूर्वी वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी रणांगणात समशेर चालवली. निजामाविरुद्धच्या खर्ड्याच्या लढाईत यशवंतराव होळकरांनी आपल्या ८० हजार फौजेनिशी शत्रुपक्षाला मात दिली. पेशव्यांचे दोन आधारस्तंभ असलेल्या होळकर आणि शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे हडपसर येथे लढाईही झाली. येथील लढाईनंतर पेशवा पुणे सोडून पसार झाला, तरीही यशवंतराव होळकरांनी त्यांच्यापुढे नम्रतेचेच धोरण स्वीकारले. आपले दोन्ही बंधू सवाई मल्हारराव आणि विठोजींचा बळी गेल्यानंतरही यशवंतरावांनी दुसर्‍या बाजीरावाशी समेटाचे प्रयत्न केले. पण, त्याला फळ मिळालेच नाही. मध्यंतरीच्या काळात ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने देशभर पसरलेल्या मराठेशाहीच्या पाईकांना संपवून, पोखरून अटकेत टाकले. शिंदे पराभूत झाल्याने दिल्लीचा बादशहाही ब्रिटिश अधिपत्याखाली आला. बुंदेलखंडात मराठे सरदार, हिंमतबहाद्दर, समशेरबहाद्दर दुसरा, झाशीचा सुभेदार शिवरामभाऊ नेवाळकर, अवधचा नवाब, निजाम सारेच मुठभर ब्रिटिशांपुढे लीन झाले. पण या सर्वांतही वेगळे उठून दिसले ते यशवंतराव होळकर! यशवंतरावांनी जीवाच्या आकांताने महाराष्ट्रापासून पार पंजाबपर्यंतचा प्रदेश तुडवला. सर्वच एतद्देशीयांना एकजुट करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन वर्षे यशवंतराव यासाठी देश तुडवत होते. पण एकी झालीच नाही.पेशवे, शिंदे, होळकर, भोसले, निजाम सगळेच एकत्र झाले असते तर ब्रिटिशांना भारताबाहेर हुसकावून लावणे सहज शक्य झाले असते. कारण, देशातील सर्वच राज्यकर्ते संख्येने, शौर्याने, गुणाने वरचढ होते. पण ब्रिटिशांच्या एकेकाला बाजूला काढण्याच्या, फूट पाडण्याच्या षड्यंत्राला ते बळी पडले आणि हा खंडप्राय देश परकीयांच्या हातात गेला. परंतु, ‘घोड्याचे जीन हेच माझे सिंहासन’ असे मानणार्‍या यशवंतरावांनी प्रतिकार सुरूच ठेवला. देशभर सार्‍यांनी ब्रिटिशांच्या ताकदीपुढे मुत्सद्देगिरीपुढे मान टाकली, पण यशवंतराव होळकरांच्या कहाणीचे वेगळेपण हेच आहे की, इतरांना ब्रिटिशांनी जसे सहजी नमवले तसे यशवंतरावांबाबत करता आले नाही. कोणीच साथ द्यायला तयार नसताना हा हताश झालेला योद्धा ब्रिटिशांशी तह करायला राजी झाला. पण, त्यांच्याच अटी, शर्ती ब्रिटिशांना मान्य कराव्या लागल्या.ज्याने संकटांची असंख्य वादळे झेलली, अंतःकरणात विजयाची आस धरली, आपली मायभूमी परकीयांच्या तावडीत सापडू नये म्हणून आपली सगळी क्षमता पणाला लावली, अशा अफाट नेतृत्व कौशल्य, पराकोटीचे युद्धनैपुण्य, दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या या रणधुरंधर यशवंतराव होळकरांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
संकलन-
प्रा.एल.डी.सरोदे,विनायक काळदाते.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close