कोविड लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांची तात्काळ माहिती द्यावी; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.

औरंगाबाद/प्रतिनिधी:दि.28
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्डबॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी यांची माहिती जवळ असलेल्या शासकीय रुग्णालयात तत्काळ द्यावी.जेणे करुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कोविड 19 लसीपासून ते वंचित राहणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रुग्णालयांना केले आहे.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड १९ लसीकरण तयारीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यदल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी चव्हाण बोलत होते.बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सर्व्हलन्स वैद्यकीय अधिकारी (प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटना ) डॉ. मुजिब सय्यद, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. ए.बी.धानोरकर, सहायक संचालक (हिवताप) डॉ. कल्याणकर आदी उपस्थित होते .पहिल्या टप्यामध्ये सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, वॉर्डबॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी इत्यादींचे लसीकरण करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सीव्हीबीएमएस या डाटाबेसवरती भरावयाची आहे. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत खाजगी रुग्णालयांनी सदर माहिती दिली आहे.