‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची मुलाखत
मुंबई/प्रतिनिधी:दि.3
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची जागतिक अपंग दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शनिवार दिनांक 3 व सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने दिव्यांग आयुक्तालयाची स्थापना केली आहे. या आयुक्तालयामार्फत दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग आयुक्तालयाची कार्यपद्धती, पुढची वाटचाल, योजना, सोई सुविधा, दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी विविध योजना, दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेले मार्गदर्शन, तसेच सल्ला केंद्र अशा विविध उपक्रमांची महत्वपूर्ण माहिती उपायुक्त संजय कदम यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. सहायक संचालक संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.