Uncategorised

शासकीय दवाखान्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदारपणे पोहोचवाव्यात- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना/भगवान धनगे,दि. 2

सर्वसामान्य व्यक्तीचे आरोग्य अधिक चांगले रहावे, यासाठी शासनामार्फत मुबलक प्रमाणात निधी, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, पुरेसे मनुष्यबळ यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या सर्व संसाधनाच्या सहाय्याने शासकीय दवाखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदारपणे पोहोचवण्यात याव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानातंर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीराचे उदघाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना,भास्कर दानवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डाॅ. प्रताप घोडके आदिंची उपस्थिती होती.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, सर्वसामान्यांचे आरोग्य अधिक चांगले रहावे व प्रत्येक आजाराचा उपचार चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी शासनामार्फत आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. समाजातील प्रत्येक रुग्णांवर उपचार करून त्यांना चांगले आरोग्य देणे हे आरोग्य सेवेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेबद्दलचा सर्वसामान्यांचा असलेला दृष्टिकोन बदलून खासगी दवाखान्याच्या धर्तीवर जिल्हा, तालुका व ग्रामीण पातळीवर आरोग्याच्या सेवा देण्यात याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बदलती जीवनशैली, विरुद्ध खानपान यासह इतर सवयीमुळे मानवी जीवनावर अरिष्ट परिणाम होत आहे. आपल्या आरोग्यपेक्षा अधिक महत्त्वाचे असे काहीच नसून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक योजना सुरू केल्या असल्याचे सांगत आयुष्यमान भारत योजनेतंर्गत मोफत स्वरूपात आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेचा अधिक प्रमाणात प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केली. देशातील महिलांची धुरापासून मुक्तता करून साडे आठ कोटी कुटुंबाना अल्प दरात गॅसची जोडणी देण्यात आली असल्याचेही श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.
आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत देशात 5 जी सेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला असल्याचे सांगत राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, आपल्या देशामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत विकासाच्यादृष्टीने मागे असलेले 114 आभासी जिल्हे आहेत. सन 2018 पासून या जिल्ह्यात विकासाची कामे करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून या जिल्ह्यातील विकास कामांवर सातत्याने लक्ष देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये बहुतांश व्यक्ती तणावग्रस्त आहेत. आनंदी राहणे हेच रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात तणावमुक्त रहाण्याबरोबरच आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी आरोग्य शिबीर आयोजना मागची भूमिका विषद केली. कार्यक्रमास पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!