Uncategorised

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपांकडून नितीन कुलकर्णी प्रबळ दावेदार!

जालना/भगवान धनगे, दि.1


राज्यामध्ये तीन शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघातील विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे. राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर 1ऑक्टोबरपासून नाव नोंदणी करण्यासाठी सुरुवात झालेली असल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक जण सज्ज झाले आहेत.एक ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर पर्यंत होणार्या या नोंदणी अभियानात सर्व शिक्षकांची नोंदणी करून घेण्यासाठी सर्वच पक्ष व संघटना सरसावल्या आहेत .
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मागील 5 वर्षापासून भाजपा शिक्षक आघाडीची संपर्क यंत्रणा प्रभावी पद्धतीने राबवून शिक्षकांचे मजबूत संघटन करण्यामध्ये प्रा नितीन कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदार संघामध्ये राष्ट्रवादीकडून सतत तीन वेळा विजय संपादन करणारे विक्रम काळे हेच पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात राहतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. औरंगाबाद शिक्षक मतदार संघावर राष्ट्रवादीचा जरी पगडा असला तरी या खेपेला भाजपा पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. या मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीला जवळपास 62 हजाराच्या वर शिक्षकांनी नाव नोंदणी केली होती. या खेपेला नवीन शाळा वाढल्यामुळे ही नाव नोंदणी 65 ते 70 हजाराच्या घरात जाऊ शकते असा कयास बांधला जात आहे.
शिक्षक मतदार संघाच्या मागील काही निवडणुका महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने लढविल्या जातात. शिक्षक परिषदेचा उमेदवार हा भाजपाचा उमेदवार असल्याचे समजून संघ परिवारातील सर्व संघटना व भाजपाचे कार्यकर्ते एकत्रितपणे शिक्षक मतदारसंघांमध्ये या निवडणुकीचे काम करतात. कोकण व मुंबईत चौदा वेळा शिक्षक परिषदेचे आमदार निवडून आलेले आहेत. औरंगाबाद विभागामध्ये सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविणारा उमेदवार व शिक्षक चळवळीतील सक्षम चेहरा म्हणून भाजपाचे शिक्षक आघाडीचे मराठवाडा संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जाते. नितीन कुलकर्णी हे शिक्षक चळवळीमध्ये मागील तीस वर्षापासून कार्यरत असणारे विश्वासार्ह नाव आहे.मागील दोन वर्षापासून निवडणूक लढविण्याच्या तयारीत ते संपूर्ण ताकदीनिशी उतरलेले असून त्यांनी जवळपास 76 तालुक्यात व 32 महानगर मंडळात भाजपा शिक्षक आघाडीचे काम व रचना यशस्वी पद्धतीने राबविली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने मुख्याध्यापकांना नोंदणीची किट 30 सप्टेंबर पर्यंत पोहोचवण्यात आलेली असल्याचे समजते. या किटमध्ये भाजपा शिक्षक आघाडीने आजपर्यंत केलेल्या कामाची यादी व भविष्यात जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांचाही सोडविण्याचा संकल्प यांचा उल्लेख या किटमध्ये करण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातील भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, आमदार भाजपाचे संघटन क्षेत्रातील महत्त्वाचे पदाधिकारी, शिक्षक कार्यकर्ते, शिक्षक आघाडीचे संघटन संपूर्णपणे प्रा नितीन कुलकर्णी यांच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये राहणार असल्याची ही चर्चा आहे. प्रा नितीन कुलकर्णी यांनी शिक्षकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेली आंदोलने व उभारलेले लढे यामुळे पक्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते, शिक्षक आघाडीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये राहतील. मराठवाड्यातील शिक्षकांच्या नाव नोंदणी करण्याच्या अभियानामध्ये भाजपाचे शिक्षक आघाडीचे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी कटिबद्ध असून जास्तीत जास्त शिक्षकांची नाव नोंदणी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
सरसकट सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आंदोलनात संगीताताई शिंदे (अमरावती) यांच्यासोबत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांनाही मानणारे शिक्षक पदाधिकारी प्रा नितीन कुलकर्णी यांच्या पाठीशी राहतील. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद जरी अधिक असली तरी या चक्रव्यूहाला भेदण्याचे बळ प्रा नितीन कुलकर्णी यांच्या पारड्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी निश्चितच टाकतील. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने शिक्षक चळवळीत योगदान देणाऱ्या प्रा नितीन कुलकर्णी यांना या निवडणुकीमध्ये शिक्षक विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून मताधिक्याने पाठवतील असा विश्वास शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो. मराठवाड्यामध्ये भाजपाचे संघटन व भाजपाला मानणारा मोठा वर्ग शिक्षण क्षेत्रामध्ये अधिक असल्यामुळे निश्चितच ही निवडणूक राष्ट्रवादीला अवघड जाण्याची ही शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये घडलेल्या सत्तांतरानंतर पदवीधर व शिक्षक मतदार संघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठीची व्यूहरचना भाजपा कडून आखली जात आहे. प्रा. नितीन कुलकर्णी यांच्या रूपाने मराठवाड्याला एक सक्षम शिक्षक आमदार लाभू शकतो. त्यामुळे त्यांची दावेदारी या खेपेला प्रबळ मानली जाते. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचून घेण्यासाठी समर्थ पर्याय म्हणून प्रा नितीन कुलकर्णी यांच्याकडे भाजपाचे कार्यकर्ते पाहत आहेत.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!