जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना जिल्ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल होणार

जालना/प्रतिनिधी,दि.15
केंद्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरीता जालना जिल्ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थ्याची शनिवार, दि. 18 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेच्या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील प्रवेश परिक्षा नियोजनबध्द व शिस्तीत काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
केंद्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या पुर्वनियोजनाच्या अनुषंगाने आज (दि.15) रोजी जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी बैठकीस अपर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल घुपे, जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य श्री. पवार, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, परीक्षा समन्वयक श्री. आंधळे यांच्यासह सर्व गटशिक्षण अधिकारी, परीक्षा केंद्रप्रमुख आणि केंद्र परीक्षा निरीक्षकांची उपस्थिती होती.
सदरील केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्याची कसुन तपासणी होणार असून, सदरील परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरीता उपविभागीय अधिकारी , तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर मंडळ अधिकारी, तलाठी यांचे बैठे पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर, हेडफोन, मायक्रोफोन, हीडन कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य वापरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात येणारे पर्यवेक्षक, समवेक्षक हे इतर तालुक्यातील असणार आहेत. तसेच पर्यवेक्षक व समवेक्षक यांना देखील मोबाईल अथवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार करणाऱ्या किंवा मदत करणाऱ्या विरुध्द भारतीय नागरिक संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.