pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नवमतदारांचा टक्का वाढला – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ.

0 1 6 5 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 23

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

अंतिम मतदार यादीच्या प्रसिध्दीनिमित्त दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत १५,५४,५१५ मतदारांची नावे समाविष्ट होती. त्यामध्ये ४४,५८३ नविन मतदारांची भर पडलेली आहे. तसेच २९,४५४ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये १५,१२९ मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या १५,६९,६४४ इतकी झालेली आहे. त्यानुसार ८,२३,५८० पुरुष मतदारांची व ७,४६,०२४ महिला मतदारांची आणि ४० तृतीयपंथी मतदारांची संख्या एवढी आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९०३ वरून ९०६ इतके झाले आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये १२,५३५ मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात १८,३३३ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ५७५३ (०.३७ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १८,२८८ (१.१६ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या २,९८,०३६ (१९.१७ टक्के) होती, ती अंतिम यादीत ३,१६,३६९ (२०,१५ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार २२,२२५ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये १०,४७७ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत ३०८१ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज – DSE) ४६८८ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून १२८८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे. मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. जिल्हयातील पाचही विधानसभा मतदारसंघात ही विशेष शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण १३८३ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली. दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रात RAMP ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हयात एकुण १२२३० दिव्यांग मतदार आहेत तर अनिवासीय भारतीय १ व सेवादलातील १५८५ मतदार आहेत.
दि. २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे, मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना सदर अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही सततच्या पुनरिक्षणामध्ये आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवण्यासाठी कार्यवाही करता येईल. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि ‘बोटर हेल्पलाइन अॅप’यावर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे