Uncategorised

इंगळे महाराज… वैकुंठ सोडा पुन्हा जन्म घ्या….सद्गुरू संत मारुती बाबा कुरेकर यांचे भावोद्गार

◆ संत इंगळे महाराज परमार्थ आश्रमातील पुण्यस्मरण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता

वडवणी/अंकुश गवळी,दि.10

इंगळे महाराज…. तुम्ही वैकुंठात काय करता…? तिथे एवढा आनंद आहे का..? तुम्ही लवकर परत या.. पुन्हा जन्म घ्या असे भावोद्गार सद्गुरू संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यक्ष महान विभूती संत मारोती बाबा कुरेकर यांनी काढले. इंगळे महाराज परमार्थ आश्रमातील काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव शिवारात इंगळे महाराज परमार्थ आश्रम वैकुंठवासी संत बाबासाहेब महाराज यांनी उभारलेला आहे. या परमार्थ आश्रमात बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता मंगळवारी सद्गुरू संत मारुती बाबा कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी बीड जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःखाचे सावट निर्माण झाले होते. वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी हानी झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये संत इंगळे महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांचे हजारो कीर्तनकार मित्र, हजारो गायनाचार्य, वादनाचार्य मंडळींनी एकत्र येऊन पुण्यतिथी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. ख्यातनाम कीर्तनकार रामायणाचार्य रामराव महाराज ढोक आणि नाशिक येथील किर्तन केसरी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गिरी यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब महाराज इंगळे यांचे सुपुत्र सोपान काका बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या नियोजनाखाली या सप्ताह सोहळा पार पडला. या सप्ताह सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने झाली. सात दिवस रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा ऐकायला मिळाली. बीड जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांनी या ठिकाणी येऊन इंगळे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता कुरेकर बाबा यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर १०:०० ते १२:०० या वेळेत काल्याचे किर्तन पार पडले. आपल्या किर्तनरुपी सेवेत सद्गुरू संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सद्गुरू संत मारुती बाबा कुरेकर यांनी इंगळे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इंगळे महाराज कीर्तनात ‘सज्जन हो’ या शब्दाचा उल्लेख करत असत. त्यांचं कारण असं आहे की इंगळे महाराजांना समोरच्या माणसांत सजणा शिवाय काही दिसलेच नाही. प्रत्येक माणसात सजनाला पाहणारे महाराज महान विभूती होते. त्यांचे कीर्तन भाविकांच्या मनात रुजायचे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची खूप मोठी हानी झाली आहे. इंगळे महाराजांना महाराष्ट्रात जोड नव्हती. असेही गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराजांचे गेल्या वर्षी निधन झालं. ही वारकरी संप्रदायाची मोठी हानी आहे. त्यामुळे महाराज तुम्ही वैकुंठात काय करता…? तुम्ही लवकर परत या… येथील भाविकांमध्ये रमा.. येथील आनंद वेगळाच आहे. तुम्ही पुन्हा जन्म घ्या असे भावोद्गार त्यांनी काल्याच्या कीर्तनातून काढले.

—————————————————————————

सोपान काका महाराजांच्या पाठीशी राहा

संत इंगळे महाराज यांनी आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा केली. एवढेच नाही तर वारकरी संप्रदायाला आपला सोपान काका नावाचा मुलगा दिला. हे सोपान काका महाराज भावी काळात इंगळे महाराज परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून संत बाबासाहेब महाराज इंगळे यांची परंपरा चांगली चालवतील. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर राहावे असे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केलं.

—————————————————————————
पांडुरंग महाराज गिरी यांनी मानले आभार

नाशिक येथील ख्यातनाम कीर्तनकार किर्तनकेसरी पांडुरंग महाराज गिरी यांनी या सप्ताह सोहळ्याचे आभार प्रदर्शन मांडले. संत इंगळे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा लाखो भाविकांनी या ठिकाणी येऊन यशस्वी केला. हा सोहळा दरवर्षी या ठिकाणी होणार आहे. आम्ही दरवर्षी याठिकाणी पूर्ण वेळ देऊन थांबू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांचे त्यांनी आभार मानले.

————————————————————————–
८० टक्के कीर्तनकारांकडे इंगळे महाराजांचा खजिना : इंदुरीकर

महाराष्ट्रातील ८०टक्के कीर्तनकारांकडे बाबासाहेब महाराज इंगळे यांचा खजिना आहे. त्यानी कीर्तनात केलेली क्रांती आजच्या कीर्तनकाराचे भांडवल आहे. माझ्यासह बहुतांशी कीर्तनकार इंगळे महाराजांच्या कृपेने त्यांचा खजिना वापरतात. त्यामुळे इंगळे महाराज यांच्या सारखे महाराज पुन्हा होणे नाही. इंगळे महाराजांनी चिंचवडगावची माती पवित्र केली. चिंचवडगाव संप्रदायाची राजधानी बनवली. अशा शब्दात ख्यातनाम कीर्तनकार समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. महाराष्ट्रातील आजच्या कीर्तनकारांनी, गायनाचार्य यांनी इंगळे महाराजांच्या चालीचा अभ्यास करावा. सर्व कीर्तनातील चाली एकत्र करून त्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!